
गडचिरोली, दि. ७ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी वरील सिरोंचा–आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून जिल्हा प्रशासनाने या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस ७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे महामार्गावरील बांधकाम अधिक सुरक्षित व सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होणार असून पावसाळ्यातील अपघातांचा धोका कमी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, आपत्कालीन सेवा, राज्य परिवहन (एसटी) व इतर प्रवासी बस, पोलीस, पाणीपुरवठा, अन्न व औषध पुरवठा, महावितरण, दूरसंचार, आरोग्य विभाग तसेच रस्ते दुरुस्तीशी संबंधित वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

जड वाहन चालकांनी सिरोंचा–मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली तसेच आलापल्ली–आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर प्रचलित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.

