
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
बोरी शेतशिवारातील घटना; जेसीबीच्या मदतीने ट्रॅक्टर बाहेर काढला
कोरची तालुक्यातील बोरी शेतशिवारात मंगळवारी दुपारी रोहिणीच्या मशागतीदरम्यान ट्रॅक्टर चिखलात अडकून पलटी झाला. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला.

कोरची मुख्यालयापासून 15 किमी अंतरावर असलेल्या बोरी येथील शेतात गुलाब शेख हे आपल्या ट्रॅक्टरने रोहिणीसाठी चिखल करण्याचे काम करीत होते. यावेळी अचानक ट्रॅक्टर चिखलात अडकला आणि इंजिन बंद पडले. अडकलेला ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी लाकडी साह्याचा वापर करण्यात येत होता. त्याचवेळी ट्रॅक्टरने अचानक पलटी घेतली.

ट्रॅक्टर चालक नरेश पोरेटी (वय 25, रा. छत्तीसगड) यांनी वेळीच बाजूला उडी मारली. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. “देव तारी त्याला कोण मारी” अशी प्रतिक्रिया यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
अपघाताची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी आणि दोरखंडाच्या सहाय्याने ट्रॅक्टर सरळ करून बाहेर काढण्यात आला.
कोरची तालुक्यात पावसाळ्यात चिखलात ट्रॅक्टर पलटीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि चालकांनी ओलसर जमिनीत काम करताना विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

