
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी, दि.८ जूलै : चामोर्शीत संताजीनगर येथे जंगलातून गावात शिरलेल्या जंगली डुकराने दोन नागरिकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मुखरीबाई खुशाल भांडेकर आणि विनोद देवाजी पिपरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संताजीनगर येथील मुखरीबाई भांडेकर या घराच्या अंगणात वाळत घातलेले कपडे काढत असताना अचानक जंगलातून आलेल्या जंगली डुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

दरम्यान, ही घटना सुरू असतानाच विनोद देवाजी पिपरे यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र जंगली डुकराने त्यांच्यावरही हल्ला करून गंभीर जखमी केले. नागरिकांनी आरडाओरड केल्याने जंगली डुक्कर जंगलाच्या दिशेने पळून गेला.
या घटनेमुळे संताजीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
दरम्यान, वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करून जखमींना शासन नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. परिसरातील नागरिकांनी वन विभागाने जंगली प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

