
नितेश गट्टीवार गडचिरोली
चामोर्शी,दि.६ जूलै:महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका चामोर्शी कार्यकारिणीची सभा रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था, चामोर्शी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ९ जुलै रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा बंद ठेवून आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष योगेश ढोरे होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष जयंत राऊत, जिल्हा सरचिटणीस खिरेंद्र बांबोळे, सल्लागार नरेंद्र कोत्तावार, रमेश रामटेके, रविंद्र वासेकर, महेंद्र वासेकर, निवृत्त केंद्रप्रमुख तथा सल्लागार जे. बी. गेडाम, मानमपल्लीवार सर, राजेश बाळराजे, तसेच जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ अलोणे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेची सुरुवात शिक्षक समितीचे संस्थापक पूज्यनीय भा. वा. शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सभेत टीईटी परीक्षेतून सर्व शिक्षकांना सूट देण्यात यावी, बीएलओच्या जबाबदारीतून शिक्षकांची मुक्तता करण्यात यावी, तसेच शिक्षकांना सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांतून पूर्णपणे मुक्त करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच तालुका व जिल्हास्तरावरील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचा शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
या सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ९ जुलै २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा सभेत करण्यात आली. या निर्णयाला उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी शिक्षकांच्या हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करत सभेची सांगता करण्यात आली.

