
शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रेरणादायी उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली देसाईगंज,दि.२२ ॶॉगस्ट : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले नगर परिषद प्राथमिक शाळा, हनुमान वार्ड, देसाईगंज येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक व खाऊचे वाटप करण्यात आले.

वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याने परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
“विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावणे, हाच वाढदिवसाचा खरा आनंद आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला. वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही नव्या उत्साहाची आणि प्रेरणेची भावना निर्माण झाली.

