
चितळाची शिकार करून मांसविक्रीचा आरोप; ९ जण ताब्यात, सुभाषग्राम शिकारप्रकरणी दोघांना अटक

गडचिरोली | चामोर्शी : आलापल्ली वनविभागातील विविध वनक्षेत्रांत वन्यजीवांच्या अवैध शिकारीची प्रकरणे सातत्याने समोर येत असतानाच आता गडचिरोली वनपरिक्षेत्रातही चितळाच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले आहे. कृपाळा गाव परिसरात चितळाची शिकार करून त्याचे मांस विक्री केल्याच्या संशयावरून वनविभागाने तब्बल ९ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे वन्यजीव शिकारीच्या घटनांवर वनविभागाने कारवाईचा बडगा उगारल्याचे स्पष्ट झाले आहे.
वनअधिकाऱ्यांना कृपाळा परिसरात चितळाची शिकार करून मांस विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची पडताळणी करून वनविभागाच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत ९ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर यांच्या नेतृत्वाखाली वनपाल प्रदीप गेडाम, जितेंद्र सोर्डे, सुनील पेंदोरकर, पुरुषोत्तम लाडे आदींच्या पथकाने केली.
सुभाषग्राम शिकारप्रकरणी दोघांना अटक
दरम्यान, आलापल्ली वनविभागातील मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्राअंतर्गत गुंडापल्ली उपक्षेत्रातील सुभाषग्राम येथेही वन्यप्राण्याच्या शिकारीचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात निर्मल ढाली, रा. सुभाषग्राम आणि विश्वजित रवींद्र रॉय, रा. तुमडी यांना वनविभागाने ताब्यात घेत अटक केली आहे.
वन्यप्राण्याच्या शिकारीशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
उपवनसंरक्षक शैलेश मीना आणि सहायक वनसंरक्षक मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा एम. मोढळे तपास करीत आहेत. कारवाईत गुंडापल्लीचे क्षेत्र सहायक आर.एल. बानोत, वनरक्षक एस.जी. राठोड, एन.डी. सोनवणे, सुनील खोब्रागडे, बी.के. लिपटे आदी वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
शिकाऱ्यांविरुद्ध वनविभागाची कडक मोहीम
गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीवांचे मोठे वैविध्य असून, वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी वनविभागाकडून गस्त आणि तपासणी वाढविण्यात आली आहे. चितळासह इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी वनविभागाने कारवाई अधिक तीव्र केली आहे.
दरम्यान, वन्यप्राण्यांची शिकार, मांसविक्री अथवा वन्यजीवांशी संबंधित कोणतीही संशयास्पद किंवा बेकायदेशीर हालचाल निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा मोढळे यांनी केले आहे.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, शिकारीविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत वनविभागाच्या या सलग कारवायांतून मिळत आहेत.

