
उच्च जोखमीची गर्भधारणा; शस्त्रक्रियेनंतर आईसह तिन्ही नवजातांची प्रकृती स्थिर
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील ३२ वर्षीय आदिवासी महिलेची उच्च जोखमीची तिहेरी गर्भधारणा अखेर सुखरूप पार पडली. हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (एलकेएएमएच) तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करून अवघ्या तीन मिनिटांत दोन मुली आणि एका मुलाला जन्म देण्यात आला. विशेष म्हणजे, तिन्ही नवजात बालकांना तत्काळ विशेष नवजात देखभाल विभागात दाखल करण्यात आले असून सध्या आईसह तिन्ही बाळांची प्रकृती स्थिर आहे.
मगेर या आदिवासीबहुल गावातील संबंधित महिलेने मार्च २०२६ मध्ये प्रथमच एलकेएएमएच रुग्णालयात उपचारासाठी भेट दिली होती. अल्ट्रासाऊंड तपासणीत तिच्या गर्भात तीन बाळे असल्याचे स्पष्ट झाले. तिहेरी गर्भधारणा ही उच्च जोखमीची असल्याने संपूर्ण गर्भावस्थेत तिची नियमित प्रसूतीपूर्व तपासणी आणि विशेष वैद्यकीय देखरेख करण्यात आली.

११ ऑगस्ट रोजी पोटात तसेच पाठीच्या खालच्या भागात सौम्य वेदना जाणवू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय पथकाने नियमित अल्ट्रासाऊंड, गर्भातील बाळांच्या हृदयगतीचे निरीक्षण तसेच आवश्यक तपासण्या करून आई व तिन्ही बाळांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले.
अकाली प्रसूतीची शक्यता लक्षात घेऊन तिन्ही बाळांच्या फुफ्फुसांच्या विकासासाठी आवश्यक औषधोपचार करण्यात आले. प्रसूतीदरम्यान आपत्कालीन शस्त्रक्रियेची गरज भासू शकते, हे लक्षात घेऊन रक्ताचीही आगाऊ व्यवस्था करण्यात आली.
२१ ॶॉगस्ट रोजी तपासणीत बाळांच्या रक्ताभिसरणात आणि हृदयगतीत चिंताजनक बदल आढळून आल्यानंतर तातडीने सिझेरियन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३२ आठवडे आणि ५ दिवसांची गर्भधारणा पूर्ण झाल्यानंतर रात्री १.२५ ते १.२७ या अवघ्या तीन मिनिटांच्या कालावधीत तिन्ही बाळांचा जन्म झाला.
जन्मावेळी तिन्ही बाळांचे वजन अनुक्रमे १ किलो ३६० ग्रॅम, १ किलो १८६ ग्रॅम आणि १ किलो ५३० ग्रॅम होते. अकाली जन्म झाल्याने तिन्ही नवजातांना विशेष नवजात देखभाल विभागात दाखल करून आवश्यक उपचार सुरू करण्यात आले.
या गुंतागुंतीच्या प्रसूतीचे व्यवस्थापन दोन स्त्रीरोगतज्ज्ञ, दोन भूलतज्ज्ञ आणि दोन बालरोगतज्ज्ञांच्या पथकाने केले.
योग्य नियोजन, वेळेवर निर्णय आणि वैद्यकीय पथकाच्या दक्षतेमुळे उच्च जोखमीची ही तिहेरी प्रसूती यशस्वी ठरली. सध्या आईची प्रकृती स्थिर असून तिन्ही बाळांवर नवजात देखभाल विभागात उपचार सुरू आहेत.
दुर्गम आदिवासी भागातील उच्च जोखमीची तिहेरी गर्भधारणा यशस्वीपणे हाताळत आईसह तिन्ही नवजातांना सुरक्षित ठेवण्यात आलेले हे यश वैद्यकीय क्षेत्रासाठी निश्चितच उल्लेखनीय ठरले आहे.

