
उभ्या पिकांवर संकट; सगणापुर परिसरातील शेतकऱ्यांचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी ,दि.२२ॶॉगस्ट : सगनापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सगनापूर मायनरला तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी भाजपा चामोर्शी कार्यालयात धाव घेऊन भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे व तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे यांच्या मार्फत आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
सगनापूर परिसरातील शेतकरी शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असून सध्या शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र सगनापूर मायनरला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने उभी पिके संकटात सापडली आहेत. पाणी वेळेत उपलब्ध झाले नाही, तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
“नहराला पाणी सोडून सगनापूर मायनरपर्यंत पाणी पोहोचवावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी सगणापुर परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.सिंचन विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पिके वाचविण्यासाठी आता विलंब न करता संबंधित जलसंपदा विभागाला आवश्यक निर्देश देऊन सगनापूर मायनरला पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे व भाजपा तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे यांच्या मार्फत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे केली आहे. यावेळी यश गण्यारपवार, संजय खेडेकर उपस्थित होते.पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

