
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली : घोट ते एटापल्ली दरम्यान असलेल्या अत्यंत दुरवस्थेतील रस्त्यांमुळे आज एसटी महामंडळाच्या बसचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक अपघात घडला आहे. गडचिरोली ते अहेरी या मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा (क्रमांक MH07 C 9483) चालत्या गाडीतच मागचा संपूर्ण सांगाडा (बॉडी) वेगळा होऊन रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे.
आज दिनांक ६ जुलै २०२६ रोजी ठीक सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही बस एटापल्ली शहरातील गोटूल भवन समोर आली असता हा विचित्र अपघात झाला. चालत्या बसचे मागचे पॅनल आणि पत्रे पूर्णपणे निखळून पडले असून, बसचा मागचा सांगाडा उघडा पडला आहे.

मोठी दुर्घटना टळली, प्रवासी सुखरूप!
हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये प्रवासी होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ऐन गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. मागचा भाग निखळल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून बस थांबवली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्रवाशांच्या जिवाशी खेळ कधी थांबणार?
घोट ते एटापल्ली हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांच्या धक्क्यांमुळे आधीच खिळखिळ्या झालेल्या गाड्यांचे पार्ट सुटे होत आहेत.
या घटनेनंतर महामंडळाच्या बसगाड्यांच्या देखभालीवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा ‘भंगार’ अवस्थेतील गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर कशा सोडल्या जातात, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
खराब रस्ते आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे प्रवाशांचा प्रवास आता ‘रामभरोसे’ झाला असून, या मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि निकृष्ट दर्जाच्या एसटी बसेस तात्काळ बदलाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

