
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार |
गडचिरोली/चामोर्शी,दि. ५ जुलै:चामोर्शी ते चंद्रपूर दरम्यान थेट एसटी बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उबाठा)चे जिल्हा संघटक विलासराव ठोंबरे यांनी केली आहे. ही बस सेवा सुरू झाल्यास तालुक्यातील हजारो नागरिकांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठोंबरे यांनी म्हटले आहे की, चामोर्शी तालुक्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयीन कामे, उच्च शिक्षण, आरोग्य सेवा, न्यायालयीन कामकाज तसेच विविध व्यावसायिक कारणांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात चंद्रपूर येथे जावे लागते. मात्र, थेट एसटी बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मधल्या ठिकाणी बस बदलून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

या समस्येचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना बसत आहे. बस बदलण्याच्या त्रासामुळे अनेकांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण होत असून, सार्वजनिक वाहतुकीचा उद्देशच काही प्रमाणात अपूर्ण राहत असल्याचे मत ठोंबरे यांनी केले.
चामोर्शी–चंद्रपूर हा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर नियमित आणि थेट एसटी बस सेवा सुरू करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसह शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल. राज्य परिवहन महामंडळाने जनहिताचा विचार करून ही मागणी तातडीने मान्य करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या मार्गावर थेट बस सेवा सुरू करण्याची मागणी यापूर्वीही विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात आली असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज स्थानिकांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता एसटी प्रशासन या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून लवकरात लवकर बस सेवा सुरू करणार का, याकडे चामोर्शी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

