
अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून सक्षम समाज व बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी त्याचे योगदान अनन्यसाधारण आहे. ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू घडविण्याचा पाया शालेय स्तरावरील शारीरिक शिक्षणातूनच रचला जातो. मात्र, गेल्या दोन दशकांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने हजारो बी.पी.एड. व एम.पी.एड. पात्रताधारक युवक-युवती बेरोजगार आहेत.
या दीर्घकालीन अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने बुधवार, दि. 08 जुलै 2026 पासून आझाद मैदान, मंत्रालय, मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यभरातून हजारो शारीरिक शिक्षण शिक्षक व पात्रताधारक उमेदवार या आंदोलनात सहभागी होणार असून हे आंदोलन पूर्णपणे शांततामय व कायदेशीर मार्गाने करण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या :
1. क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती तात्काळ जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करावी.
2. शासन निर्णय दि. 02 जानेवारी 2026 नुसार मंजूर 4,860 क्रीडा शिक्षकांची सर्व (100%) पदे पवित्र पोर्टल TAIT-2025 च्या पहिल्या टप्प्यात भरावीत.
3. शासन निर्णय दि. 15 मार्च 2024 नुसार रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.
4. जिल्हा परिषद, केंद्रशाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व रिक्त शारीरिक शिक्षण (क्रीडा) शिक्षकांची पदे तातडीने पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.
5. पवित्र पोर्टल TAIT-2025 भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व बी.पी.एड., एम.पी.एड. पात्रताधारक शारीरिक शिक्षण शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे मार्गदर्शक श्री. प्रद्युम्न जोशी, श्री. कैलास माने, श्री. विश्वनाथ पाटोळे, श्री. अमोल जोशी, राज्याध्यक्ष श्री. संदीप मनोरे, राज्य सचिव श्री. तायाप्पा शेंडगे तसेच सर्व राज्य, विभाग व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातूनही सर्व पात्रताधारक शारीरिक शिक्षण शिक्षकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

