
प्रतिनिधी/चामोर्शी : आष्टी येथे अप्पर तालुका कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला घोट ग्रामपंचायतीने तीव्र विरोध दर्शवित, घोटलाच स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने उपविभागीय अधिकारी, चामोर्शी यांना सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, घोट हे चामोर्शी तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील मोठे व मध्यवर्ती गाव असून परिसरातील २० ते २५ गावांसाठी प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या भागातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे घोट येथे तालुका कार्यालय स्थापन करणे ही परिसरातील जनतेची अनेक वर्षांपासूनची रास्त मागणी आहे.
ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार, घोट परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असून, तालुका निर्मितीसाठी आवश्यक भौगोलिक, प्रशासकीय व लोकसंख्येचे निकष पूर्ण होत आहेत. त्यामुळे आष्टी येथे अप्पर तालुका कार्यालय सुरू करण्याऐवजी घोटला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देणे अधिक न्याय्य व लोकहिताचे ठरेल.
दरम्यान, घोट परिसरातील नागरिकांनीही उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची भेट घेऊन आष्टी अप्पर तालुका प्रस्तावाला विरोध नोंदविला. “घोट तालुका झालाच पाहिजे” अशी भूमिका घेत नागरिकांनी निवेदन सादर करत परिसरातील जनभावना प्रशासनापर्यंत पोहोचविली.
याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक नागरिक व विविध गावांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोट तालुक्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी एकजूट दाखवत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

