
गडचिरोली | दि. ५ जूलै:
गडचिरोली जिल्ह्यातील भूसंपादन, वाढती अवजड वाहतूक, पर्यावरण प्रदूषण, दुर्गम भागातील आरोग्य व शिक्षण सुविधा, तसेच शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या विविध मागण्यांसाठी कोनसरी परिसरातील शेतकरी शिष्टमंडळाने शनिवारी (दि. ४ जुलै) आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात धडक देत सविस्तर निवेदन सादर केले
शिष्टमंडळाने गडचिरोलीच्या विकासात स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, वाढत्या अवजड वाहतुकीमुळे होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी कोनसरी परिसरातील उद्योगातून कथितरीत्या वैनगंगा नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या प्रश्नाकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पाण्याच्या नमुन्यांची मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी, तपासणी अहवाल सार्वजनिक करावा आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. जलप्रदूषणाचा पर्यावरण, वन्यजीव, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा वैज्ञानिक अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याशिवाय आदिवासी, शेतकरी, महिला, बेरोजगार युवक आणि वंचित घटकांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित सर्व प्रश्न राज्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली.
निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रश्नांचा सखोल आढावा घेऊन योग्य निर्णयासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सोनू वाळके,रोशन कोटरंगे ,संजय कुमरे, सोनू कावडे,नाजूक कुमरे प्रवीण कोवे,कुशाब गोडबोले, कल्पना चांदेकर,निरुबाई जेगटे आदि उपस्थित होते.
या सकारात्मक आश्वासनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांना पुन्हा एकदा राजकीय व प्रशासकीय स्तरावर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, प्रस्तावित बैठकीकडे शेतकरी, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

