
“जिल्हा परिषद शाळेतून शिकणारा विद्यार्थीही भविष्यात प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो” – मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे
गडचिरोली | प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त गडचिरोली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मेंढा येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना, “शिक्षण ही दररोजची तपस्या आहे. सातत्य, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर जिल्हा परिषद शाळेतून शिकणारा विद्यार्थीही भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनू शकतो,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
प्रवेशोत्सवानिमित्त नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, ढोल-ताशांच्या गजरात आणि प्रभातफेरीच्या माध्यमातून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळेतील आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणे, शाळेतील नियमित उपस्थिती वाढविणे आणि प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेंढा येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीच्या काळात विश्रांती घेता यावी यासाठी उभारण्यात आलेल्या ‘पिंक रूम’ विश्राम कक्षाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे विद्यार्थिनींना अधिक सन्मानपूर्वक व अनुकूल वातावरणात शिक्षण घेणे शक्य होणार आहे.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामस्थ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने पालक व गावकरी उपस्थित होते.

