
वाढीव वीजबिले, जुने मीटर बसविणे, बिल भरण्यास मुदतवाढ व दोषींवर कारवाईसह विविध मागण्यांसाठी जनआंदोलन
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली
चामोर्शी, दि. १ जुलै : महावितरणकडून बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरच्या विरोधात तसेच वाढीव वीजबिले, जुने मीटर पुन्हा बसविणे, वीज ग्राहकांवरील अन्याय दूर करणे आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता चामोर्शी येथील महावितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

लक्ष्मी गेट, चामोर्शी येथून मोर्चाला प्रारंभ होणार असून तो महावितरण कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनात शेतकरी, व्यापारी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.मोर्चादरम्यान स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करून जुने मीटर पुन्हा बसविणे, वाढीव वीजबिलांची सखोल चौकशी करून ती कमी करणे, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करणे तसेच वीजबिल भरण्यास मुदतवाढ देणे या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत.
आयोजकांनी स्पष्ट केले की, हा मोर्चा कोणत्याही पक्षीय किंवा राजकीय स्वार्थासाठी नसून सर्वसामान्य वीज ग्राहक, शेतकरी आणि नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी एकजुटीने आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

