
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.२९ जून: हिरापूर भागातील सुपीक जमिनी एमआयडीसीसाठी (MIDC) संपादित करण्याच्या शासनाच्या धोरणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आपल्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आ. सुधीर मुनगंटीवार आणि खा. प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.
लोकप्रतिनिधींकडे धाव: आपली सुपीक जमीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत यांच्यासह आ. सुधीर मुनगंटीवार व खा. प्रतिभा धानोरकर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने हा प्रश्न संसद आणि विधानसभेत लावून धरून शेतकऱ्यांना न्याय देण्याची आग्रही मागणी केली आहे.

विमानतळ प्रकल्पाला विरोध: हिरापूर आणि गुरवळा परिसरातील प्रस्तावित विमानतळ शेतकऱ्यांच्या जमिनीवर करण्यास शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
भेंडाळा भागातील ९ हजार एकर जमिनीचा प्रश्न: भेंडाळा भागातील तब्बल ९ हजार एकर जमीन एमआयडीसीला देण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. “आम्ही एक इंचही जमीन देणार नाही,” अशी भूमिका घेत स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र लढा उभारला आहे.
संघर्ष कृती समितीचे आंदोलन: जिल्हा संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामध्ये धरणे, मुंडण आणि जीआर दहन अशा विविध आंदोलनांचा समावेश आहे.
यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक सतीश विधाते, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, नदिम नथानी, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, दिवाकर मिसार, दिगांबर धानोरकर, गौरव येनप्रेडिवार, ढिवरू मेश्राम, विलास चिचघरे, तेजस कोंडेकर, कुणाल आभारे, संजय बुराडे, अभिषेक रोहणकर, आशिष घेर, ओमप्रकाश चौधरी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

