
न्यूज जागर
गडचिरोली/मुंबई:
भारत हा कृषीप्रधान देश असूनही या देशात बळीराजावर सातत्याने अन्याय होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीसाठी गोदामे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि मोठ्या गावांमध्ये धान साठवणुकीसाठी गोदामांची तात्काळ व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे.

खरीप आणि रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची ससेहोलपट
विधानसभेत बोलताना आ. मसराम म्हणाले की, मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी शासनाकडून जी वाढीव मुदत मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीपासून वंचित राहावे लागले. आता रब्बी हंगामातही धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे.
गोदामे फुल्ल झाल्याने खरेदी ठप्प
शेतकऱ्यांचे धान न खरेदी होण्यामागे गोदामांची अनुपलब्धता हे मुख्य कारण आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी शासकीय गोदामे धान खरेदीने फुल्ल झाली आहेत, त्यामुळे गोदामाअभावी धान खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत असून, त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
शासनाला थेट इशारा
शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शासनाने तातडीने पावले उचलून गडचिरोली जिल्ह्यातील गोदामांची क्षमता वाढवावी आणि प्रत्येक गावात धान खरेदी सुरळीत करावी, अशी आग्रही मागणी आ. रामदास मसराम यांनी सरकारकडे केली आहे.

