
मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली : जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी विभागीय स्तरीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेसाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या विकासाला मोठी क्षमता असून, आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रशुद्ध पद्धती आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून या क्षेत्राला नवी दिशा मिळू शकते. ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विभागीय स्तरीय प्रशिक्षण केंद्रासाठी पुढाकार घेतला आहे.

या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवती, मत्स्यपालक तसेच या व्यवसायाशी संबंधित नागरिकांना आधुनिक मत्स्यपालनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे. परिणामी स्थानिक पातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन मत्स्यव्यवसायाच्या विस्ताराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
बैठकीत प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया, पायाभूत सुविधा, जागा, प्रशिक्षण व्यवस्था आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्राची स्थापना प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.
गडचिरोलीसारख्या मोठ्या जलसंपदा असलेल्या जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे प्रस्तावित प्रशिक्षण केंद्र हे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
बैठकीस आमदार डॉ. मिलिंद नरोटे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

