
विशेष जिल्हा प्रतिनिधी | अमित कत्तीवार
एटापल्ली (गडचिरोली ): तालुक्यातील जपतलई येथील शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंश झाल्याने कु. दीपिका एतवा लकडा या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुःखद घटनेनंतर पीडित कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती.
घटनेनंतर श्रीमती मितालीताई आत्राम यांनी दीपिका लकडा यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन त्यांना आर्थिक मदत केली होती. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार देत मदतीचा हात पुढे केल्याने कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला.

यानंतर अहेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते दीपिका एतवा लकडा यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. या वेळी एटापल्ली गट विकास अधिकारी श्री. श्रीकृष्ण पेंडाम, मा. हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दीपिका लकडा यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. आर्थिक मदतीच्या माध्यमातून संकटाच्या काळात कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जपतलई येथील या घटनेमुळे आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या निवासाची ठिकाणे सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. वसतिगृह परिसरात सर्पांचा वावर रोखण्यासाठी नियमित स्वच्छता, गवतझुडपे काढणे, सर्पप्रतिबंधक उपाययोजना तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याची गरज आहे.
दीपिका लकडा हिच्या अकाली निधनामुळे तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अशा कठीण प्रसंगी मितालीताई आत्राम यांनी केलेली आर्थिक मदत तसेच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते देण्यात आलेली एक लाख रुपयांची मदत कुटुंबासाठी आधार ठरत आहे.
दरम्यान, भविष्यात आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी लक्षात घेऊन सर्व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांची नियमित तपासणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पालक व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

