
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली : यावर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील बहुतांश शेतकरी धान पिकावर अवलंबून असून, अपुऱ्या पर्जन्यमानामुळे पिकांना सिंचनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, कृषी पंपांसाठी होणारा अनियमित व अपुरा वीजपुरवठा यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील कृषी पंपांना २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक शेतकरी धान पिकाची शेती करतात. धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. ज्या भागांमध्ये सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी अल्प पर्जन्यमानाच्या परिस्थितीत या सुविधांचा प्रभावी वापर करून पिकांना आवश्यक पाणी देणे शक्य आहे. मात्र, कृषी पंपांना पुरेसा व नियमित वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने सिंचन व्यवस्था असूनही त्याचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाही.
सध्या पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पाण्याची आवश्यकता असून, वेळेवर सिंचन न झाल्यास शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी पंपांना नियमित व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी पत्रात नमूद केले आहे.
अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील कृषी पंपांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली आहे. यामुळे उपलब्ध सिंचन सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करून शेतकऱ्यांना पिकांना आवश्यक पाणी देता येईल आणि दुष्काळसदृश परिस्थितीत पिके वाचविण्यास मोठी मदत होईल.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

