
सिरोंच्यात दोन दिवस मुक्काम; भामरागडमधील पूरस्थितीची करणार पाहणी

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली : राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम हे ४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान सिरोंचा, अहेरी आणि भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत. या दौऱ्यात सिरोंचा येथे सलग दोन दिवस मुक्काम करत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यासोबतच भामरागडमधील पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
डॉ. आत्राम हे २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून विमानाने नागपूर येथे पोहोचतील. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे मुक्काम करून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी चंद्रपूर, बल्लारशाह, राजुरा, लकडकोट, मंचेरियाल व चेन्नूर मार्गे सिरोंचाकडे प्रयाण करतील. दुपारी सिरोंचा येथे पोहोचल्यानंतर त्यांचा सिरोंचा येथे मुक्काम राहणार आहे.

५ ऑक्टोबर रोजीही डॉ. आत्राम सिरोंचा येथे मुक्कामी राहणार असून, या कालावधीत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधून विविध प्रश्नांचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी दुपारी सिरोंचाहून मंचेरियाल व कागजनगर मार्गे अहेरीकडे प्रयाण करून ते अहेरी येथील राजवाड्यात मुक्काम करतील.
दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी सकाळी भामरागडकडे रवाना होऊन तेथील पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. पूरग्रस्त भागातील परिस्थिती, नागरिकांना निर्माण झालेल्या अडचणी तसेच स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते अहेरीला परतणार आहेत.
डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या या दौऱ्यामुळे सिरोंचा, अहेरी आणि भामरागड परिसरातील स्थानिक प्रश्नांना पुन्हा एकदा प्रशासनिक व राजकीय पातळीवर महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.

