
सेवानिवृत्तीनंतर दोन लाखांचा सामाजिक योगदानाचा संकल्प; कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशपूर्व प्रशिक्षण

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी)दि.०२ ऑक्टोबर :

यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शीचे प्राचार्य शाम रामटेके यांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय शैक्षणिक सेवेला भावपूर्ण निरोप देत सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी त्यांच्या पत्नी अरुणा रामटेके यांच्यासह त्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक ते प्राचार्य असा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकासाला विशेष महत्त्व दिले.
रामटेके यांनी आपल्या मनमिळावू स्वभावातून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. विद्यालयाच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय वाटचालीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेचा वसा कायम!
सत्काराला उत्तर देताना शाम रामटेके यांनी ३१ वर्षांच्या सेवाकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याचवेळी त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेतून तब्बल दोन लाख रुपये सामाजिक कार्यासाठी देण्याची घोषणा केली.
या निधीतून कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना कायद्याच्या उच्च शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या आठवणींनी वातावरण भावूक
सेवानिवृत्ती सोहळ्यात शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करून रामटेके यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि मान्यवरांनी त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या तळमळीचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रामटेके यांना सन्मानपूर्वक निरोप देत त्यांच्या निवासस्थानापर्यंत सोबत केली. ३१ वर्षांच्या सेवेनंतर सहकाऱ्यांनी दिलेल्या या जिव्हाळ्याच्या निरोपाने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि सोहळ्याची सांगता भावनिक वातावरणात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य राजू धोडरे होते. प्रमुख अतिथी म्हणून राहुल लोकविकास मंडळाचे सचिव विवेकजी सहारे, कोषाध्यक्ष वकटुजी उंदीरवाडे, प्रशासकीय अधिकारी विनोद हाटकर, ॲड. बोधी रामटेके, प्रा. प्रेमानंद वालदे, रेवनदासजी उंदीरवाडे तसेच इतिहास मेश्राम उपस्थित होते. मान्यवरांनी रामटेके यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गव्हारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयश्री कोठारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण नैताम, गुरु सातपुते, लोकनाथ दूधबळे, निलेश क्षिरसागर, अमोल उंदिरवाडे, प्रा. प्रदीप भांडेकर, दिपाली घोंगडे, सचिन पिपरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मण गव्हारे, माणिक चंद्रागडे, अनिल बोरुले, आनंद रामटेके, आशाताई उंदीरवाडे आणि करुणा रामटेके यांनी विशेष सहकार्य केले.

