
News जागर विशेष

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरू असतानाच, या आंदोलनाला विरोध करण्यासाठी ‘झेन नेक्स्ट’कडून मंत्रालय परिसरात प्रतिआंदोलन करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सीजेपीकडून गुरुवारी (२ ऑक्टोबर) शिवाजी पार्क मैदानावर ‘जेलभरो’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह संपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. तसेच २०२९ची निवडणूक २०२५च्या मतदार यादीच्या आधारे घेण्यात यावी, अशी मागणीही सीजेपीने केली आहे. एसआयआर प्रक्रियेवरून विरोधकांकडून निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप केले जात असताना सीजेपीनेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. दिपके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे सरकार आणि निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले.

दरम्यान, सीजेपीच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी ‘झेन नेक्स्ट’चे आंदोलनकर्ते मंत्रालयाच्या परिसरात रस्त्यावर उतरले. यावेळी अभिजीत दिपके यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. एकाच दिवशी मुंबईतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या आंदोलनांमुळे निवडणूक प्रक्रिया आणि एसआयआरच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.

