
डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी स्वीकारला पदभार; टिळक भवनात गडचिरोलीच्या शिष्टमंडळाकडून जंगी स्वागत

मुंबई | जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी आज मुंबईतील दादर येथील काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथे आपल्या पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते हा पदभार स्वीकृती सोहळा पार पडला.
डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या पदभार स्वीकृतीनिमित्त टिळक भवनात काँग्रेसच्या आजी-माजी खासदार, आमदार, मंत्री तसेच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा मिळण्याचे संकेत या निमित्ताने मिळाले.

गडचिरोलीच्या शिष्टमंडळाकडून उत्स्फूर्त स्वागत
या सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातून विशेष उपस्थिती नोंदवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांनी काँग्रेस नेते पंकज गुड्डेवार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक बाबी, पक्षवाढ तसेच जनतेच्या विविध प्रश्नांवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या नव्या जबाबदारीसाठी गडचिरोलीच्या शिष्टमंडळाने त्यांना शुभेच्छा दिल्या.
संघटन मजबूत करण्यासाठी नवी दिशा
डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि संघटनात्मक कार्यकौशल्य यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय वाढवणे आणि पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आगामी वाटचालीकडे पाहिले जात आहे.
डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या पदभार स्वीकृतीमुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचे चित्र टिळक भवनातील या सोहळ्यात पाहायला मिळाले.

