
चामोर्शीत गडचिरोली पोलिसांची सायबर जनजागृती मोहीम; OTP, PIN, CVV न सांगण्याचे आवाहन

नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी | दि. ३ ऑक्टोबर : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन चामोर्शी यांच्या वतीने शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार, बनावट लिंक, KYC अपडेट, नोकरीचे आमिष तसेच लॉटरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
OTP, PIN, CVV शेअर करू नका!
सायबर फसवणूक टाळण्यासाठी OTP, ATM PIN, CVV, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नये, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच बँक किंवा अधिकृत संस्था असल्याचे भासवून माहिती मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
संशयास्पद लिंक म्हणजे फसवणुकीचा सापळा!
‘लॉटरी लागली’, ‘नोकरी मिळाली’, ‘KYC अपडेट करा’, ‘खाते बंद होणार’ अशा संदेशांमधून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, असेही पोलिसांनी सांगितले. अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने कोणताही संदेश किंवा लिंक तपासल्याशिवाय त्यावर कृती करू नये, असा सल्ला देण्यात आला.
फसवणूक झाली तर वेळ न दवडता १९३० वर फोन करा
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले.
या जनजागृती कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘सुरक्षित रहा… सायबर जागरूक रहा!’ या संदेशातून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
पोलीस स्टेशन चामोर्शी, गडचिरोली पोलीस यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत होत आहे.

