
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली (चामोर्शी), दि. २ : शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य धनेद्र चौधरी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख प्रा. शोभा गेडाम, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. विजय मेश्राम, प्रा. नाझीम शेख, ग्रंथालय प्रमुख प्रवीण ब्राम्हणवाडे, वरिष्ठ लिपिक अनिल बांबोडे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. माधवी रामने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता व सामाजिक समतेच्या विचारांची तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेच्या कार्याची माहिती देण्यात आली.
यावेळी प्राचार्य धनेद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश दिला, तर शास्त्रीजींनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा केवळ अभ्यास न करता ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच या जयंतीची खरी सार्थकता आहे.”
यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर मनोगते व्यक्त केली. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवा, स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रसेन ताकसांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मनोज सराटे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता आणि राष्ट्रसेवेची भावना रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

