
न्यूज जागर
गडचिरोली | प्रतिनिधी | दि. ३० : नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ गडचिरोली जिल्ह्यात उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात झाला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त पुढाकारातून जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुलाबपुष्प, प्रभातफेरी, बग्गी मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर आणि पाठ्यपुस्तक वितरणातून नवागत विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुरखळा तसेच शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, गडचिरोली येथे भेट देऊन नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, मुरखळा येथील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः त्याचे स्वागत केले. त्यानंतर प्रभातफेरी आणि वाजतगाजत विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. या उपक्रमात पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा म्हणाले, “शिक्षण ही एका दिवसाची गोष्ट नसून ती दररोजची तपस्या आहे. नियमित अभ्यास, शिस्त, जिज्ञासा आणि आत्मविश्वास यांच्या बळावरच यश मिळते. आजचे विद्यार्थीच उद्याच्या विकसित भारताचे शिल्पकार आहेत.”
ते पुढे म्हणाले की, शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, सामाजिक आणि नैतिक विकासाची पायाभरणी करणारे केंद्र आहे. त्यामुळे शिक्षक आणि पालकांनी मुलांमध्ये चांगले संस्कार, सकारात्मक विचार आणि शिस्त रुजविण्यास प्राधान्य द्यावे.
यावेळी मुरखळा शाळेत विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीदरम्यान विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या विश्राम कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे विद्यार्थिनींना अधिक सन्मानपूर्वक आणि अनुकूल वातावरणात शिक्षण घेणे शक्य होणार आहे.
दरम्यान, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची आकर्षक बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली. फुलांची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदाच्या वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. उपस्थित होते.
जिल्हाभरातील विविध शाळांमध्येही प्रवेशोत्सव जल्लोषात पार पडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी मेंढा येथील शाळेला, तर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गोगाव येथील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण केले.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, पालकांचा उत्साह आणि शिक्षकांची प्रेरणादायी साथ यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शाळा प्रवेशोत्सव संस्मरणीय ठरला.

