
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली
चामोर्शी/भेंडाळा,दि.१८ जून:
शासनाकडून प्रकल्पाच्या कामाला ३ महिन्यांची स्थगिती देण्यात आली असतानाही, जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीचे कर्मचारी भेंडाडा परिसरात दाखल झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शासनाचा आदेश पायदळी तुडवून छुप्या पद्धतीने काम सुरू करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तीव्र विरोध दर्शवला.

मिळालेल्या माहितीनुसार, भेंडाळा परिसरातील सुपीक आणि सिंचनाखालील जमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचालींमुळे शेतकरी आधीच आक्रमक झाले आहेत. वाढता विरोध लक्षात घेऊन शासनाने या संपूर्ण प्रक्रियेला ३ महिन्यांची स्थगिती दिली होती. असे असतानाही, कंपनीचे कर्मचारी भागात आल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त गावकऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा तिव्र निषेध व्यक्त केला.

