
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी ,दि.१८ जून:
जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य सेवा आणि एमआयडीसी तसेच प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नांकडे राज्य सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॶॅड. विश्वजित कोवासे यांनी केली आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी म्हटले आहे की, एमआयडीसी आणि प्रस्तावित विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी अधिग्रहित होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर धान बोनसची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी नियमित बससेवा उपलब्ध नसल्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. तसेच अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर, कर्मचारी, औषधे आणि वैद्यकीय साधनसामग्रीचा अभाव असल्याने नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्य सरकार गडचिरोलीला विकासाच्या दृष्टीने महत्त्व देत असल्याचा दावा करीत असले, तरी प्रत्यक्षात शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यात अपयश आल्याची टीका ॶॅड.कोवासे यांनी केली.
पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांनी जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचा धान बोनस तात्काळ वितरित करावा, विद्यार्थ्यांसाठी नियमित बससेवा सुरू करावी, जमीन अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण अवलंबावे आणि आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, अन्यथा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ॶॅड.कोवासे यांनी दिला आहे.

