
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
देसाईगंज (वडसा), दि. १७ जून : जुनी वडसा येथील शास्त्री वॉर्डात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येणारा नियमित पाणीपुरवठा बंद अवस्थेत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र हा टँकरही दर दोन दिवसाआड येत असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
पाणीटंचाईमुळे अनेक नागरिकांना दूरवर जाऊन पिण्याचे पाणी भरावे लागत असून दैनंदिन वापरासाठी शेतातील विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे.

संबंधित विहिरींची अवस्था अत्यंत दयनीय असून त्या ठिकाणी जनावरे व पाळीव कुत्रे पडून मृत झाल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या. अशा अस्वच्छ व दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत आमदार रामदासजी मसराम यांनी शास्त्री वॉर्डाला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता वैभव आत्राम यांना सोबत घेऊन पाणीपुरवठा व्यवस्था, विहिरींची स्थिती तसेच नागरिकांच्या अडचणींची माहिती घेतली.
पाहणीदरम्यान आमदार मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
यावेळी उपस्थित धनपाल मिसार,योगेश नेवारे, राजेश्वर सहारे, पांडुरंग बगमारे, भाऊराव नाकतोडे, शामराव तलमले, बकाराम प्रधान, हरिचंद्र ढोरे, रवींद्र धकाते, कुणाल नेवारे, महादेव नेवारे, मोजिम पठाण, सफी शेख, सुरेखा ढोरे, यशोदा सहारे, ममता नेवारे, विद्या नेवारे, समीर शेख, मीना नेवारे, सुप्रिया अडकिले, दुर्गा नाकतोडे, भाविका नाकतोडे, इमला देवढगले, सुरेखा देवढगले, वैशाली देवढगले, खैरुज पठाण, व गावातील नागरिक उपस्थित होते तेव्हा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत शास्त्री वॉर्डातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी केली.

