
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी,दि.१७ जून: राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच प्रोत्साहनपर अनुदान व पीक विमा योजनांमधील कठोर अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू असलेली ५० हजार रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, २०१७ च्या कर्जमाफीपासून कागदपत्रांच्या त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि एक रुपयातील पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली.

प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग चार वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अट रद्द करावी, पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या पीक कर्जांचे पुनर्गठन करून आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांतील सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने कोणत्याही अटी-शर्तींशिवाय शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या निवेदनावर नगरसेवक तथा जिल्हा मध्यवर्ती बँक गडचिरोलीचे संचालक अमोल गण्यारपवार, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष राजू आत्राम, चामोर्शी तालुका प्रभारी अध्यक्ष विनोद डोंगरे, चामोर्शी शहराध्यक्ष सुरेश नैताम, जिल्हा ओबीसी अध्यक्ष अशोक घोडरे, युवा अध्यक्ष पंकज दहेकर, गडचिरोली विधानसभा उपाध्यक्ष राजू येगोलेपवार, माजी नायब तहसीलदार डंबारे आणि मुकेश्वर तिताडे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

