
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोटगुल येथे आदिवासी नेत्यांनी भेट देत शाळेची सविस्तर पाहणी केली. यावेळी शाळेतील शैक्षणिक व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा तसेच वसतिगृहाची स्थिती यांचा बारकाईने आढावा घेण्यात आला.
पाहणीदरम्यान शाळेची इमारत, वर्गखोल्या, स्वच्छता व्यवस्था, वसतिगृह तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आणि शैक्षणिक प्रगती यासंदर्भात मुख्याध्यापकांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मुख्याध्यापकांसोबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक व निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला. तसेच शाळेसमोरील समस्या वरिष्ठ स्तरावर मांडून त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आदिवासी नेत्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यात क्रांतीदादा केरामी (माजी आविस जिल्हाध्यक्ष, गडचिरोली), नंदूभाऊ नरोटे (सरसेनापती, आविस नागपूर), कुळसंगे सर (मुख्याध्यापक), मानू कुमरे, कोराम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या पाहणी व संवाद कार्यक्रमांना विशेष महत्त्व असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. भविष्यातही शैक्षणिक प्रश्न, विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि आश्रमशाळांच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

