
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर गडचिरोली
चामोर्शी,दि.१६ जून
राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात नागरिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. १६ जून) आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सरकारने नागरिकांच्या प्रश्नांना स्पष्ट आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर दि. २ जुलै २०२६ (गुरुवार) रोजी दुपारी १२ वाजता लक्ष्मी गेट, चामोर्शी येथून आष्टी रोडवरील महावितरण कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या मोर्चात नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
पत्रकार परिषदेत स्मार्ट मीटर योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात प्रत्यक्षात कपात होणार का, प्रीपेड वीज प्रणाली भविष्यात सक्तीची केली जाणार का, ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याची सरकार हमी देणार का, तसेच स्मार्ट मीटर बसविण्याचा खर्च नेमका किती असून तो कोण उचलणार, याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय स्मार्ट मीटरच्या माध्यमातून भविष्यात वीज दरवाढ अथवा अतिरिक्त शुल्क आकारण्याचा कोणताही प्रस्ताव आहे का, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली. स्मार्ट मीटरचे फायदे, तोटे आणि अटी याबाबत नागरिकांना संपूर्ण माहिती न दिल्याबद्दलही सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
अनेक ठिकाणी प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे वीज बिले पाठविली जात असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसत असल्याचे नमूद करत अशा चुकीच्या बिलांमुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवालही उपस्थित करण्यात आला. वाढीव वीज बिलांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींवर सरकार कोणती ठोस उपाययोजना करणार आणि सामान्य नागरिकांना स्वस्त, अखंड व पारदर्शक वीज सेवा देण्यासाठी नेमकी काय योजना आहे, याची माहिती जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
सरकारने स्मार्ट मीटर योजनेबाबत सर्व शंकांचे निरसन करून पारदर्शक भूमिका जाहीर करावी. जनतेच्या हिताविरोधात कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही. सरकारकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला एनएसयूआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास चिचघरे, मीडिया तालुका अध्यक्ष विजय लाड, हेमंत कोवासे, अमर मोगरे, आशिष घेर, ओमप्रकाश चौधरी, प्रेमानंद गोंगले, तेजस कोंडेकर, संजय बुरांडे, गिरीधर चौधरी आदी उपस्थित होते.

