
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/चामोर्शी:
माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी उपजिल्हा रुग्णालयाला सदिच्छा भेट देत रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या ऑपरेशन रूमची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, उपलब्ध वैद्यकीय यंत्रणा तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान डॉ. होळी यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली.

सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, अनावश्यक उन्हात फिरणे टाळावे व उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉ. देवराव होळी यांनी केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण किलनाके, डॉ. बिधान देवरी, डॉ. तलमले सर, डॉ. रॉय सर उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयात सुरू असलेल्या विविध आरोग्य सुविधांची माहिती देऊन भविष्यातही नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

