
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली : भूमी अधिग्रहण व प्रस्तावित विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या प्रश्नावर न्याय मिळावा या मागणीसाठी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने गुरुवारी भावनिक आणि हृदयस्पर्शी वळण घेतले. जवळपास चार ते पाच हजार शेतकरी, शेतमजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिवसभर ठिय्या आंदोलन सुरू ठेवत आपल्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सायंकाळी आंदोलनस्थळी असे दृश्य पाहायला मिळाले, ज्याने अनेकांच्या मनाला चटका लावला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस मुख्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरच शेकडो शेतकरी कुटुंबांसह पंगतीत बसून जेवण करताना दिसून आले. देशाच्या अन्नदात्याला, जनतेच्या पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्याला स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर बसून जेवण करण्याची वेळ आल्याचे हे दृश्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरले.
आंदोलनाच्या आयोजकांनी पहिल्या दिवशी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सामूहिक जेवणाची व्यवस्था केली होती. हजारो शेतकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने जेवणाचा लाभ घेतला. मात्र, आंदोलन अधिक काळ चालण्याची शक्यता लक्षात घेता उद्यापासून प्रत्येक शेतकरी आपल्या घरातून शिधा घेऊन येणार असून जेवणाची व्यवस्था स्वतःच करणार असल्याची माहिती आंदोलनाच्या नेतृत्वाकडून देण्यात आली.

आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांनी या परिस्थितीबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. “जो शेतकरी वर्षानुवर्षे देशाच्या जनतेच्या अन्नाची व्यवस्था करतो, त्यालाच आज न्यायासाठी रस्त्यावर बसून जेवावे लागत आहे,” अशी भावना अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळाली. शासनाच्या धोरणांमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती सरकारच्या संवेदनशीलतेला जाग आणेल का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या आंदोलनाला विविध सामाजिक आणि व्यावसायिक संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला आहे. गडचिरोली जिल्हा वकील संघाने आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच आंदोलनाशी संबंधित कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये शेतकऱ्यांना निशुल्क मार्गदर्शन व मदत करण्याचे आश्वासन वकील संघाच्या प्रतिनिधींनी दिले.
याशिवाय, गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्यसेवा संघटनांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प व्यक्त केला. दीर्घकाळ चालणाऱ्या आंदोलनादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याची प्रकृती बिघडू नये, यासाठी आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
भूमी अधिग्रहण आणि विमानतळ प्रकल्पाच्या संदर्भातील मागण्यांवर शासनाकडून अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता कायम आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांचा निर्धार अधिकच दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे. हजारो शेतकरी कुटुंबांसह रस्त्यावर उतरले असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
रस्त्यावर बसून जेवण करणाऱ्या अन्नदात्याचे हे दृश्य शासन आणि प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडेल का, तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघेल का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला असून त्याच्या या संघर्षाला न्याय मिळावा, अशी भावना समाजातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

