
अहेरी, सिरोंचा, एटापल्लीसह ७ ठिकाणी अतिरिक्त तहसील कार्यालयांना मंजुरी; १५ ऑगस्टला होणार घोषणा
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१० मे :
जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी जिल्हा मुख्यालय किंवा मूळ तहसील कार्यालयापर्यंत येण्यासाठी करावी लागणारी पायपीट आता थांबणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने गडचिरोली जिल्ह्यातील सात महत्त्वाच्या तालुक्यांचे विभाजन करून त्या ठिकाणी ‘अतिरिक्त तहसील कार्यालय’ निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामध्ये अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, धानोरा, आरमोरी, कुरखेडा आणि चामोर्शी या तालुक्यांचा समावेश आहे.

कुठे होणार नवीन कार्यालये?
वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन खालील ठिकाणी नवीन कार्यालये मंजूर करण्यात आली आहेत:
अहेरी: जिमलगट्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय.
सिरोंचा व एटापल्ली: असरअल्ली आणि कसनसूर येथे कार्यालये.
धानोरा व आरमोरी: पेंढरी आणि वैरागड येथे नवीन पदे मंजूर.
चामोर्शी: आष्टी येथे नवीन अतिरिक्त तालुका महसूल कार्यालय.
कुरखेडा: मालेवाडा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय.
निर्णयाचे महत्त्व आणि फायदे
जिल्हा मुख्यालयापासून असलेले अंतर आणि दुर्गम भागातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
वेळ आणि पैशांची बचत: असरअल्ली किंवा कसनसूर सारख्या भागातील नागरिकांना आता ४०-५० किमीचे अंतर कापून जाण्याची गरज उरणार नाही. अवघ्या १० ते २० किमी अंतरावर प्रशासकीय कामे मार्गी लागतील.
अप्पर तहसीलदारांना पूर्ण अधिकार: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नुसार, या नवीन कार्यालयांना मूळ तहसील कार्यालयाप्रमाणेच सर्व अधिकार व कर्तव्ये सोपवण्यात येणार आहेत.
लोकसंख्येचा ताण कमी होणार: वाढत्या लोकसंख्येमुळे महसूल विभागावर येणारा कामाचा ताण या विभाजनामुळे कमी होईल.
‘घोट’ तालुका निर्मितीची आशा धूसर?
चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र ‘घोट’ तालुक्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. मात्र, शासनाने घोट ऐवजी आष्टी येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर केल्यामुळे आता स्वतंत्र घोट तालुका निर्मितीच्या हालचाली मंदावल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
राज्याच्या महसूल व वन विभागाच्या सह-सचिवांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले असून, येणाऱ्या १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिनी) या नवनिर्मित कार्यालयांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

