
नितेश गट्टीवार गडचिरोली /आरमोरी दि.१७ :
गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. बहुप्रतिक्षित वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असतानाच, काल रेल्वेचे इंजिन आरमोरी शहराच्या हद्दीत दाखल झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आरमोरीकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
प्रत्यक्ष रेल्वे रुळावर धावताच नागरिकांची गर्दी:गेल्या अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना होती. काल जेव्हा रेल्वेचे इंजिन प्रत्यक्ष आरमोरी परिसरात रुळावरून धावताना दिसले, तेव्हा नागरिकांनी ते पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर ‘आरमोरीत आली रेल्वे’ अशा कॅप्शनसह रिल्स शेअर केल्या आहेत.

विकासाच्या प्रवासाला वेग:हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली जिल्हा थेट रेल्वे नकाशावर येईल. यामुळे केवळ प्रवासाची सुविधाच उपलब्ध होणार नाही, तर व्यापार, उद्योग आणि रोजगाराच्या संधींनाही मोठी चालना मिळणार आहे. आरमोरी हे या मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असल्याने शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
सोशल मीडियावर रिल्सचा पाऊस:फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आरमोरी रेल्वेचे विविध व्हिडिओ सध्या ट्रेन्डिंगमध्ये आहेत. “आमच्या शहरात रेल्वे येणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” अशा भावना स्थानिक तरुणांनी व्यक्त केल्या आहेत. प्रशासनाकडून कामाचा वेग पाहता, लवकरच या मार्गावर नियमित रेल्वे सेवा सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

