
श्री . नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी , गडचिरोली
कोरची :
वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय, कोरची येथील राष्ट्रीय सेवा योजना व स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह समारोप व रोजगार मार्गदर्शन” कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. व्ही. टी. चहारे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलिस स्टेशन कोरची येथील एपीआय श्री. मुकुंद देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. आर. एस. रोटके तसेच पोलिस स्टेशन कोरची येथील अशोक घाटघुमर उपस्थित होते.
श्री. मुकुंद देशमुख यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा तयारी तसेच शासकीय सेवेत करिअर घडविण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. आजच्या काळात शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे नुसती पदवी प्राप्त करून आपणाला नोकरी मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी विविध कौशल्ये विकसित करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सोबतच दिनांक 16 एप्रिल 2026 ला गडचिरोली येथे आयोजित रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्ष डॉ. व्ही. टी. चहारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकून त्यांच्या विचारांना ऊजाळा दिला. याप्रसंगी उपस्थित अतिथी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या सरनाम्याचे वाचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सी. एस. मांडवे यांनी केले. त्यांनी सामाजिक समतेचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदिप चापले यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एम. डब्ल्यू. रुखमोडे यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक समतेबरोबरच रोजगाराच्या संधींबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

