
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१६ एप्रिल:
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका अंतर्गत मौजा डेहन टोला, ग्रामपंचायत अमुरकसा या दुर्गम गावाच्या विद्युतीकरणाच्या कामास अखेर मंजुरी मिळाली असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. स्वातंत्र्य काळापासून तब्बल ७५ वर्षांनंतर या गावात प्रथमच वीज पोहोचणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महत्त्वपूर्ण कामासाठी आमदार रामदास मसराम यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासन स्तरावर प्रयत्न केले. तसेच काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष, कोरची मनोज अग्रवाल यांच्या सूचनेनुसार या विषयाला प्राधान्य देत आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.

त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच या कामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच गाव उजळणार आहे.
विद्युतीकरणामुळे गावातील शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनमानात मोठा बदल होणार आहे. आतापर्यंत अंधारात जीवन जगणाऱ्या ग्रामस्थांना आता वीजेच्या सुविधेमुळे नवे आयुष्य मिळणार आहे.

