
भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांना अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेचे निवेदन
नितेश गट्टीवार नागपूर/गडचिरोली दि.९ एप्रिल:
नागपूर शहरात आदिवासी समाजासाठी स्वतंत्र, सुसज्ज समाज भवन नसल्याची खंत व्यक्त करत, गौड राजे बक्त बुलंद शाह यांच्या वारशातील ६ एकर जागा समाज भवनासाठी दान करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. रेशीमबाग परिसरातील भूमापन क्रमांक ५७३ ही जागा राजे विरेंद्र शाह बक्त बुलंद शाह यांच्या मालकीची असून ती आदिवासी विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारे निवेदन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेच्या वतीने देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले कि, दरवर्षी दुर्गम भागातील अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी नागपुरात मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून वसतिगृहाची सुविधा उपलब्ध असली तरी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता ती अपुरी पडत आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र क्रीडांगणाचा अभाव असून शासकीय अभ्यासिकाही मर्यादित आहेत.
या पार्श्वभूमीवर, शिक्षण, निवास, क्रीडा आणि इतर सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक समाज भवन उभारण्याची आदिवासी समाजाची मागणी आहे. यासाठी आवश्यक असलेली ६ एकर जागा दान करण्यास संबंधित मालक तयार असतानाही, नागपूर सुधार प्रन्यासकडून त्या जागेला ‘पीओ लँड’ म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
गौड राजे बक्त बुलंद शाह यांनी वसवलेल्या नागपूर शहरात आज त्यांच्या समाजातील बांधवांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.
या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनाही निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळाशी संवाद साधताना डॉ. देवराव होळी यांनी सकारात्मक भूमिका दर्शवत ठोस आश्वासन दिले. ते म्हणाले की, “आदिवासी समाजाच्या हक्काच्या या मागणीसाठी मी स्वतः पुढाकार घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. संबंधित ६ एकर जागेच्या विषयात कोणताही अन्याय होऊ देणार नाही. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी संबंधित विभागांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यास प्रयत्न करेन.”
पुढे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, निवास आणि क्रीडा सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नागपूरसारख्या शहरात सुसज्ज समाज भवन उभारणे ही काळाची गरज आहे. समाजाच्या हितासाठी जागा दान करण्याची तयारी ही अत्यंत स्तुत्य बाब असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना व युवकांना मोठा फायदा होईल.”
यावेळी निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद मसराम, आकाश मडावी महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष, श्याम कार्लेकर विदर्भ सचिव, ललित मडावी, सागर इवनाते यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

