
सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर दि .१६ ऑगस्ट ला दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोविंदपूर गावालगत एका अतिवेगवान कारने उभ्या दुचाकीस्वारास धडक दिली व भीषण अपघात घडला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच ठार झाला असून, एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
चामोर्शीकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या एका शेवरलेट कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या धक्क्याने एक दुचाकीस्वार दुचाकीसह थेट शेतात फेकला गेला.
या अपघातात गोविंदपूर येथील विजय सुखदेव सातपुते वय ४८ वर्षं यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी लता विजय सातपुते वय ४० वर्षे सुधाकर रमेश दुधबळे वय २४ वर्षे रा. नवेगाव (रै) आणि देवेंद्र भांडेकर वय ४२ वर्षे रा. नवेगाव (रै) हे गंभीर जखमी झाले आहेत. देवेंद्र भांडेकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, पायाचे हाड मोडले आहे.
निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या कारचालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

