
सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
आजाद समाज पार्टीची आगामी निवडणुकी संदर्भातील महत्वपूर्ण बैठक संपन्न
स्थानिक स्वराज्य संस्थेत आजाद च्या पहिल्या 11 उमेदवार कोण ?

गडचिरोली – आजाद समाज पार्टीची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक आज उत्साहात पार पडली. बैठकीत निवडणूक रणनीती, उमेदवारांची पहिली यादी आणि संभाव्य युतीसंदर्भातील चर्चा करण्यात आली.
बैठकीचे अध्यक्षस्थान पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम यांनी भूषविले, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष राज बन्सोड उपस्थित होते. विशेष म्हणजे, देशातील शोषित व वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या Disom Foundation द्वारा संचालित The Youth Development Fellowship साठी गडचिरोली जिल्ह्यातील आजाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिथी म्हणून जिल्हा प्रभारी हंसराज उराडे, महिला आघाडी अध्यक्षा सोनाशी लभाने उपस्थित होत्या.
बैठकीत निवडणूक तयारीबाबत महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. कोरची ते चामोर्शी पर्यंतच्या 20 जिल्हा परिषद क्षेत्रांमध्ये पक्ष ताकदीने निवडणूक लढवेल, असा निर्णय घेण्यात आला. उर्वरित जागेबाबत पुढील महिनाभरात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. या ठरावानुसार प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हा उपाध्यक्ष चेतन कांटेंगे, खुशाल मरस्कोल्हे, प्रवक्ते प्रितेश अंबादे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे, महिला आघाडी अध्यक्षा सोनाशी लभाने, महिला संघटक प्रीती इंगळे यांसारखे मुख्य पदाधिकारी प्रत्यक्ष मैदानात उतरतील.
पहिल्या यादीत पक्षाचे 11 उमेदवार जाहीर करण्यात आले असून, ही घोषणा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी धर्मानंद मेश्राम यांनी केली. लवकरच इच्छुकांची चाचपणी करुन योग्य त्या उमेदवारांची दुसरी यादी घोषित करणार परंतु पक्ष पदाधिकाऱ्यांना प्राधान्य असणार असेही यावेळी तें म्हणाले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राज बन्सोड म्हणाले, “स्थानिक स्तरावर जे समीकरण पक्षासाठी योग्य राहील अशा पक्षांशी युतीचे दारे उघडी आहेत. मात्र, जनतेच्या हिताला व पक्ष समितीच्या बैठकीतील निर्णयाला प्राधान्य देतच निर्णय घेतले जातील.”
बैठकीच्या शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आगामी निवडणुकीत पक्षाचा विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि गावागावात जाऊन पक्ष मजबूत करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
बैठकीचे संचालन महासचिव पुरुषोत्तम रामटेके, प्रास्ताविक हंसराज उराडे व आभार गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
——————
NEWS JAGAR(आवाज सत्याचा)

