
प्रशासनाकडूनही अवहेलना गडचिरोलीत वन्यप्राणी संकट गडद.
गडचिरोली – जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा हल्ल्याचे प्रमाण वाढले असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडूनही पीडितांना सहकार्य मिळत नसल्याने कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
२ डिसेंबर राेजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरमाेरी तालुक्याच्या इंजेवारी येथे गावापासून अवघ्या दीड किमी अंतरावर कुंदाबाई खुशाल मेश्राम (६५) यांना शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्यांच्या कुटुंबीयांना शवविच्छेदनासाठी ३ डिसेंबरच्या एक वाजेपर्यंत वाट बघावी लागल्याने प्रशासन आणि वन विभागाच्या असंवेदनशीलतेविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी शेतातील कचरा काढण्यासाठी कुंदाबाई ह्या मंगळवारी दुपारी २ वाजता आपल्या नातवासह दुचाकीने शेतात गेल्या. दीड किमी अंतरावर पटाच्या दाणीच्या परिसरात त्यांचे शेत आहे. नातवाने त्यांना शेतात साेडून दिले व ताे घरी परतला. त्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास नातू हा कुंदाबाईला घेण्यासाठी शेतात गेला असता कुंदाबाई तेथे दिसल्या नाही. आजी घराकडे परत आली असेल म्हणून ताे घरी आला; मात्र तेथेसुद्धा आजी नव्हती.

ताे आपल्या आईसह दुचाकीने पुन्हा शेतात गेला व आजीचा शाेध घेऊ लागला. दरम्यान शेतातील बांधीत रक्ताचा सडा दिसला. त्यांनी शेतशिवारात शाेध घेतला असता कुंदाबाई ह्या तलावाच्या पाळीखाली मृतावस्थेत आढळल्या. वाघाने त्यांच्या मानेचा काही भाग खाल्लेला हाेता. घटनेची माहिती गावात कुटुंबीयांना देताच. गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी कुटुंबीयांना वीस तास वाट पाहावी लागली. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधितांना सूचना केल्या. त्यानंतर सर्व प्रक्रिया गतिमान झाली.
गेल्या पंधरा दिवसात या परिसरात वाघाने तिघांचा बळी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मृत कुंदाबाई यांच्या तीन एकर शेतातील पिकाची रानटी हत्तींनी नासधूस केली होती. त्यानंतरही वन विभागाकडून योग्य उपाय योजना केल्या गेल्या नाही. देसाईगंजचे उपवनसंरक्षक यांचे सुद्धा सातत्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबतीत लोकप्रतिनिधीही निष्क्रिय असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमोल मारकवार यांनी केला आहे.
पंधरवड्यातील तिसरी घटना
जिल्ह्यात यावर्षी वाघांनी पाच जणांचा बळी घेतला आहे. १ मार्च राेजी चामाेर्शी तालुक्यातील गणपूर रै. येथील संताेष भाऊजी राऊत, ५ जून राेजी देलाेडा (सुवर्णनगर) येथील मीराबाई आत्माराम काेवे यांना वाघाने ठार केले, तर इंजेवारीलगतच्या देऊळगाव येथे १९ नाेव्हेंबर राेजी मुक्ताबाई दिवाकर नेवारे यांना वाघाने ठार केले. याच दिवशी देऊळगाव येथीलच सरस्वताबाई जिंगर वाघ ह्यासुद्धा गावालगतच्या झुडपी जंगलात मृतावस्थेत आढळल्या. त्या १२ नाेव्हेंबरपासून बेपत्ता हाेत्या. त्यांनाही वाघानेच ठार केले हाेते. २ डिसेंबरची यंदाची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
ही घटना अतिशय गंभीर आहे. वनविभाग आणि प्रशासनाने यावर तत्काळ कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र, यात दुर्लक्ष झाले असल्यास माहिती घेऊन संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येईल. रमेश कुमार, वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त

