
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोंडेकल ग्रामवासियांनी कक्ष क्रमांक 309 हा कोंडेकल ग्रामसभेच्या नावाने करण्याबाबत उपवनसंरक्षक, वन विभाग गडचिरोली यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी करत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, कक्ष क्र. 309 हा पेसा कायद्यानुसार कोंडेकल ग्रामसभेला शासनाद्वारे अधिकारपूर्वक प्रदान करण्यात आला असून ग्रामसभेने गेली अनेक वर्षे या वनक्षेत्राचे संरक्षण व संवर्धन निष्ठेने केले आहे.
मात्र अलीकडील नोंदवहीत तुडमेड गावाचे नाव कक्ष 309 मध्ये जोडण्यात आल्याने कोंडेकल ग्रामस्थांना वन निस्तार, परवानग्या व हक्क वापरात गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे ग्रामसभेचे पारंपरिक व कायदेशीर हक्क बाधित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, “कक्ष क्र. 309 मधून तुडमेड गावाचे नाव वजा करून ते कोंडेकल ग्रामसभेच्या नावाने पुनःस्थापित करण्यात यावे.”
निवेदन स्वीकारताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी ग्रामस्थांच्या मागणीस पूर्ण पाठिंबा दर्शवून संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी निवेदन देतांना विकास धुर्वे, विनोद धुर्वे, कैलास धुर्वे, जुनिका धुर्वे, सुधाकर पोटावी, दिवाकर धुर्वे, झुरी धुर्वे, असंमती धुर्वे आदि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होती.

