
वर्धा – अदानी उद्योग समूहाने सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठात पाऊल टाकले आणि अख्ख्या जिल्ह्याच्या भुवया उंचावल्या. अदानी फॉउंडेशनच्या सर्वेसर्वा डॉ. प्रीती अदानी आपल्या लवाजाम्यासह जेव्हा आल्या तेव्हाच आता काही वेगळे शिजत असल्याची शंका चर्चेत आली. पण मेघे व अदानी सोशल फॉउंडेशन यांच्यात समन्यायी करार झाला आणि अदयाप मेघे आहेत, हे कळताच लोकांनी सुटकेचा निश्वास टाकल्याचे बोलल्या गेले.
आता परत अदानी चर्चेत आलेत. पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी यात पुढाकार घेतला आहे. वर्धा शहर व लगतच्या ग्रापं क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अदानी समूहाने सीएसआर निधीतून हाती घेण्यासाठी सहकार्य करावे, असे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदानी फांडेशनच्या प्रमुख प्रिती अदानी यांना दिले आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.वर्धा शहर व परिसराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
वर्धा शहर आंतराष्ट्रीय पातळीवार ओळखल्या जाते. तथापि, वर्धा शहर आणि लगतचे गावे जलद परिवर्तनाच्या काळातून जात आहेत. वाढत्या शहरी विकासामुळे, वाढती लोकसंख्येची घनता आणि वाढत्या व्यावसायिक क्रियाकलापांमुळे, पर्यावरणीय स्वच्छता आणि नागरी सौंदर्यशास्त्र राखण्यात प्रशासनाला वाढत्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी घन कच-याचे व्यवसथापन करताना अनेक अडचणी निर्माण होतात. शहरी विस्तार: पायाभूत सुविधांची वाढ आणि वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधांवर आणि स्वच्छता प्रणालींवर दबाव वाढला आहे. ज्यामुळे अव्यवस्थित कचरा, राहणीमानाचा दर्जा कमी झाला आहे आणि सार्वजनिक जागा ढासळत आहेत.कचरा व्यवस्थापनातील तफावत: योग्य पृथक्करण, विल्हेवाट आणि पुनर्वापर यंत्रणेचा अभाव यामुळे दृश्यमान कचरा आणि आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
हिरव्या आच्छादनाचे नुकसान: अनियंत्रित बांधकाम आणि ग्रीन झोनकडे नागरी दुर्लक्ष यामुळे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय संतुलन कमी झाले आहे.वेळीच हस्तक्षेप न केल्यास, या समस्या वाढत जाणार आहे. ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य, पर्यटन क्षमता आणि एकूणच राहणीमानावर त्याचा विपरीत परिणाम होईल.

शहर आणि त्याच्या आसपासच्या गावांचा कायापालट करण्यासाठी ‘स्वच्छ वर्धा, सुंदर वर्धा’ हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. ही केवळ एक सौंदर्यीकरण मोहीम नाही तर वर्धा शहराचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक धोरणात्मक प्रतिसाद आहे. या कार्यक्रमात घनकचरा व्यवस्थापन, शून्य कचरा क्षेत्रे, सार्वजनिक जागा हिरवळीने सुशोभित करणे, नागरिक सहभाग आणि शालेय कार्यक्रमांद्वारे जागरूकता सुरू करणे तसेच घरे आणि व्यवसायांमध्ये पुनर्वापर आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू करणे, ज्यामुळे ते स्वच्छता, शाश्वतता आणि नागरी अभिमानाचे एक आदर्श शहर बनू शकते. या समुदाय-चालित मोहिमेसाठी आम्ही सामाजिकदृष्ट्या सक्रिय संस्थांकडून सीएसआर निधीद्वारे मदतीची अपेक्षा करीत आहोत. या उदात्त प्रयत्नात आपला सहभाग असावा, असे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदानी फाउंडेशनच्या डॉ. प्रिती अदानी यांना विनंती केली आहे.
सदर प्रकल्पावर अधिक चर्चा करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याशी संपर्क करण्याची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी अदानी समूहाला केली आहे.
वर्धा शहर व लगतच्या परिसरात घनकचरा समस्या मोठी आहे. घनकच-याचे नियोजन करताना अनेक अडचणी येतात. नप व ग्रापं वर घनकचरा व्यवस्थापन करताना प्रचंड आर्थिक भूर्दंड पडतो. शिवाय मनुष्यबळाची देखील कमतरता असते. त्यामुळे अदानी सूहाच्या माध्यमातून वर्धा शहर व लगतच्या ग्रापं क्षेत्रातील घनकच-याचे व्यवस्थपन व्हावे व शहर तसेच लगतचा परिसर स्वच्छ व सुंदर व्हावा, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. याच प्रयत्नामुळे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून अदानी फांऊडेशनला सीएसआर निधीतून हा प्रकल्प राबविण्याची विनंती करण्यात आली, असे पालकमंत्री डॉ. भोयर नमूद करतात.

