
विजय वडेट्टीवार यांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर.
चंद्रपूर – येत्या काळात काँग्रेस पक्ष “किंचित’ होईल. अशी टीका करणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा कॉग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेत कॉग्रेस किंचित नाही तर भाजपाला “चिंतित’ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या शब्दात पलटवार करित आमदार वडेट्टीवार यांनी देशात धर्मांधतेचे विष पेरत जाती – जाती मध्ये भांडणे लाऊन लोकशाहीच्या नीतिमूल्यांची गळचेपी करणाऱ्या हुकूमशाही व मनुवादी विचाराच्या भाजपला धडा शिकविण्याचे आवाहन केले.
विधिमंडळ पक्ष नेते तथा काँग्रेस नागपूर विभाग निवडणूक प्रमुख आ. विजय वडेट्टीवार यांनी नागपूर विभागात बैठकांचे सत्र सुरू केले. रविवार २३ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, भिसी, नागभीड, ब्रम्हपुरी, घुग्गुस, बल्लारपूर, मुल तर गडचिरोली जिल्ह्यात वडसा, आरमोरी, व गडचिरोली येथे आढावा बैठका पार पडल्यात.
या बैठकींमध्ये पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी विजयासाठी जनतेच्या मनात स्थान निर्माण करणे हेतू करावयाचे प्रयत्न, पक्षाचे ध्येय धोरण, विचार, आगामी काळात करावयाची विकासकामे, तसेच नागरिकांशी करावयाचा प्रेमळ संवाद याबाबत विश्वास मार्गदर्शन केले. तसेच उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना त्यांची नाराजी तसेच निवडणुकीत संभाव्य होणारी गटबाजी दूर करत त्यांना विशेष जबाबदारी देऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्यासाठी व पक्षनिष्ठा कायम राखण्यासाठी मार्गदर्शन केले.
काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच आघाडीत सहभागी समविचारी घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजूट, एकसंघ होऊन यशस्वी लढा उभारावा असेही त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आढावा बैठकीत आवाहन केले. आढावा बैठकीत भाजप सह अनेक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्ष प्रवेश केला. तसेच आयोजित बैठकींना सर्व स्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी बैठकींना काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घुग्घुसला नगर पालिकेचा दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न साकारले
वडेट्टीवार यांनी थेट भाजप नेत्यांना लक्ष्य करत म्हटले की ग्रामपंचायतच्या कार्यकाळात येथे अंदाजे १० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ग्रामपंचायतच्या नावावर इथे माल लुटण्याचे काम सुरू होते. जनतेच्या हक्काचे पैसे ओरबाडले गेले. आज तेच घोटाळेबाज निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांचे सरकार असल्यामुळे ते कारवाईतून वाचले.” भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल होते, परंतु सत्तेचे संरक्षण मिळाल्यामुळे कोणावरही हात टाकला गेला नाही. घुग्घुस नगर परिषदेला मंजुरी माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात मिळाली, “घुग्घुसला नगर पालिकेचा दर्जा मिळवून देणे हे माझे स्वप्न होते, जे काँग्रेसने पूर्ण केले. भाजपने या नगर पालिकेला प्रखर विरोध केला, कारण त्यांना ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या अनियमिततांवर विराम नको होता.”
पती पंजा चिन्हावर तर नाराज पत्नीची बंडखोरी
घुग्घुस येथे प्रभाग ११ मधील काँग्रेस उमेदवार पवन आगदारी यांच्या पत्नी रणजिता आगदारी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. नवरा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवित असतांना नाराज पत्नीने बंडखोरी केल्याची चर्चा येथे राजकीय वर्तुळात आहे.

