सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना आता आरोग्याची चिंता वाटायला लागली
गडचिरोली :- मूल मध्ये अलीकडेच भेसळयुक्त खाद्यतेलाचा तब्बल २२ लाखांचा साठा जप्त झाल्याच्या घटनेनंतर आता गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांमध्येही मोठी चिंता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातही अशा प्रकारचा भेसळयुक्त तेलाचा साठा असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने गडचिरोली जिल्ह्यात तातडीने चौकशी मोहिम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेल, मिष्टान्न, फराळाचे साहित्य यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने बाजारात भेसळीचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट तेल विकले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या खाद्यतेलाचे नमुने तपासून कारवाई करावी, तसेच भेसळ करणाऱ्यांवर कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नागरिकांची आहे
भेसळयुक्त तेलामुळे आरोग्याची चिंता वाढली – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
: सणासुदीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यतेल विक्रीस येत असल्याचे उघड झाल्यानंतर नागरिकांमध्ये आरोग्याविषयीची चिंता वाढली आहे. भेसळयुक्त तेलामुळे पोटाचे विकार, यकृताच्या तक्रारी, तसेच हृदयरोगाचा धोका वाढू शकतो, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
अलीकडेच मूल येथे तब्बल २२ लाखांचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त झाल्याने नागरिकांत मोठी खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजारपेठेत विक्री होणारे तेल आणि खाद्यपदार्थ यांची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दिवाळी सणात फराळ, लाडू, चकल्या, करंज्या आदी पदार्थांसाठी वापरले जाणारे तेल भेसळयुक्त असल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाने तातडीने नमुने तपासून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील नागरीकांची आहे.
