सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
गडचिरोली, ता. 17 : दुर्गम, नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ट प्रशासनिक कामगिरी करून आदर्श निर्माण करणारे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते “आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठी” राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, आदिवासी व्यवहार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध राज्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा प्रशासनाने “आदी कर्मयोगी अभियान” अंतर्गत जिल्ह्यात ५५३ आदी सेवा केंद्रे स्थापन करून शिक्षण, आरोग्य, पोषण आणि उपजीविकेच्या योजना थेट ग्रामपातळीवर पोहोचवल्या. गावकऱ्यांच्या सहभागातून स्थानिक पातळीवर विकास आराखडे तयार करून शासनाच्या योजनांचा समन्वय साधण्यात आला.
जिल्हाधिकारी पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वनहक्क कायद्यांतर्गत ५ लाख हेक्टरहून अधिक वनजमिनीचे अधिकार ग्रामसभांना हस्तांतरित करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे.
पुरस्कार स्वीकारताना पंडा म्हणाले, “हा सन्मान संपूर्ण गडचिरोली जिल्हा प्रशासनाचा आणि इथल्या जनतेचा आहे. शासनाच्या योजनांमध्ये लोकांचा थेट सहभाग मिळाल्यासच खरी प्रगती साधता येते.”
या गौरवामुळे महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय पातळीवर आणखी एक मानाचा तुरा जोडला गेला आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे संपूर्ण देशभर कौतुक होत आहे.
