
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि निसर्गसंपन्न भागात वसलेल्या कोरची तालुक्यातील कोटगुल–गोडरी गावाजवळून उगम पावणाऱ्या जीवनदायिनी शिवनाथ नदीच्या उगमस्थळाला ‘क’ श्रेणी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे, अशी आग्रही मागणी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष तथा युवा नेते विनोद कोरटी यांनी राज्याचे मुख्यमंत्री व पर्यटन मंत्र्यांकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेले हे उगमस्थान वर्षभर पर्यटकांना आकर्षित करण्याची मोठी क्षमता बाळगून आहे. मात्र, योग्य नियोजन व विकासकामांच्या अभावामुळे हे विहंगम स्थळ आजही उपेक्षित राहिले आहे. या ठिकाणी ‘क’ श्रेणी पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास रस्ते, पिण्याचे पाणी, सुशोभीकरण, निवारा यांसारख्या मूलभूत सुविधा उभारणे शक्य होणार आहे.

शिवनाथ नदीचा उगम परिसर अत्यंत शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य असून येथे पर्यटनाच्या मोठ्या संधी दडल्या आहेत. पर्यटन स्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच परिसराच्या आर्थिक व सामाजिक विकासाला गती मिळेल.
गडचिरोली जिल्ह्याला लाभलेल्या समृद्ध वनसंपदेच्या पार्श्वभूमीवर शिवनाथ नदीच्या उगमस्थानाचा विकास झाल्यास हा परिसर एक उत्कृष्ट पिकनिक स्पॉट आणि निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो. यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या ठिकाणाचे जतन करून अधिकृत पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडूनही जोर धरत आहे. शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा विनोद कोरटी यांनी व्यक्त केली आहे.

