
विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेला प्राधान्य; क्रेनच्या साहाय्याने युनिटची यशस्वी स्थापना
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, चामोर्शी येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत आधुनिक फंक्शनल टॉयलेट युनिट बसविण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने हे युनिट शाळेच्या आवारात यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले असून, या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज शौचालयाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या नवीन युनिटमध्ये शौचालय (Toilet) आणि मुतारी (Urinal) यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा अधिक सोयीस्करपणे पूर्ण होण्यास मदत होणार असून, शाळेतील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे, स्वच्छतेच्या सवयी विकसित करणे आणि शाळेच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे या दृष्टीने ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच ‘स्वच्छ भारत अभियान’ च्या उद्दिष्टांनाही या उपक्रमामुळे हातभार लागणार आहे.
शाळेतील नवीन सुविधेचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर करावा, परिसरात स्वच्छता राखावी आणि शाळेची मालमत्ता जपावी, यासाठी पालकांनीही आपल्या पाल्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“स्वच्छ शाळा – निरोगी विद्यार्थी – उज्ज्वल भविष्य” या संकल्पनेला बळ देणाऱ्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून स्वागत होत आहे.

